सांगली गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :
जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील मुंजेवस्ती येथे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधीक्षक मनीषा डुबुले व उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली गुन्हे अन्वेषण शाखेच्या छाप्यात २ लाख ५७ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पांढरेवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर मुंजेवस्ती आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली यांना खास खबऱ्यामार्फत अंबादास शेशाप्पा तांबे (वय ४० रा.पांढरेवाडी) यांच्या ऊसाच्या शेतात गांजा लागवड केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता, त्यांनी लागवड केलेल्या उसाच्या शेतात गांजा (एकूण: २५ किलो ७०० ग्रॅम) आढळून आला. त्याचा पंचनामा केला असता बाजारभावाप्रमाणे २ लाख, ५७ हजार रुपये इतकी किंमत झाली. सांगली गुन्हे अन्वेषण, उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष अंबादास तांबे यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, भगवान कोळी, संदीप पाटील, संदीप नलवडे, आमसिद्ध खोत, नामदेव काळेल, संतोष माने, सिद्धेश्वर मोरे, हरिभाऊ खंडागळे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या