वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू !

अंकलगी येथे मुख्य वाहिनीला स्पर्श झाल्याने घडली दुर्घटना!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

जत तालुक्यातील अंकलगी येथील वीज वितरण कंपनीच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाला. पैगंबर मिरासाहेब मुल्ला (वय ३१) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंकलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत कंपाऊंडला लागून संडास बाथरूम बांधलेले आहेत व त्यावर ५०० लिटरची पाण्याची टाकी आहे.त्यावर अवघ्या अडीच ते तीन फूटावरुन मुख्य वाहिनीची तार गेली आहे. पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन पाण्याची पाईप निघाली होते. पाण्याची नासाडी होते, म्हणून पैगंबर मुल्ला बाथरूमच्या टाकीवर चढून पाईप बसवण्यासाठी चढले होते. पाईप बसवून उठले असता अवघ्या अडीच ते तीन फूटावर असलेल्या मेन लाईनची तार डोक्याला स्पर्श झाली व ते खाली दगडावर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन एक-दोन वर्षाची लहान मुले आहेत. घरच्य कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, नाईक रामराव बनेनवर, पोलीस पांढरे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
उमदी पोलीस ठाण्यात नातेवाईक सलिम अबदुल अपराध ( वय २९) यांनी फिर्याद दिली आहे.या घटनेची उमदी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे .