कोसारीमध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

ग्रामीण विकास संस्था, कोसारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली, क्रांती लोकसंचालित साधन केंद्र जत यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्ताने आरोग्य शिबीर घेण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील आरोग्य सेविका , आशा सेविका, अंगणवाडी सेविका व इतर महिला उपस्थित होत्या. सर्वाचा महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.
महिला दिनाची माहिती सांगताना महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंजनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत असे सांगण्यात आले.डॉ.सुतार व मोरे यांनी महिलांना आरोग्याविषयी चांगले मार्गदर्शन केले.त्यानंतर आरोग्य शिबीर घेण्यात आले. अनेक महिला व गावातील लोकांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्यावेळी माविमच्यावतीने कन्याकुमारी बिरादार, आरोग्य विभागाचे डॉ.अजय सकट, आरोग्य सेविका मुक्ता गीते , आरोग्य सेवक कुलकर्णी , डॉ.सुतार, मोरे व संस्थेच्या वतीने विवेक टेंगले, विमल साळे, मनीषा काळे, दिगंबर गोरे, सलीमा शेख, रुपाली खरात, सुनील चौगुले, ओंकार काळे, विशाल महारनुर,सोनिकर उपस्थित होते.