पोस्टाच्या ‘अजब कामाची गजब कहाणी!’

पाठवणाराचेच पत्र पाठवणाराच्या माथी!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील सरपंचांनी पोलिस अधीक्षकांना साध्या टपालाने पाठवलेले पत्र तातडीने पुन्हा रविवारी सुट्टीच्या दिवशीच सरपंचाच्या हातात दिल्याचा प्रकार जांभुळणी येथे घडला. इतक्या जलद व सुट्टीच्याही दिवशी काम करण्याइतपत पोस्ट हायटेक झाले का? असा सवाल सरपंच सौ.संगिता मासाळ यांनी उपस्थित केला.
जांभुळणी येथील सरपंचांनी गावातील कामानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालय,सांगली येथे दिनांक २४ फेब्रुवारी रोजी साध्या टपालाने बंद लिफाफ्यातून पत्र पाठवले होते. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी हे टपाल खरसुंडी येथील पोस्ट कार्यालयात दाखल झाल्याचा शिक्का ठपकविण्यात आला आहे.त्यानंतर हे पाकीट रविवारी दुपारीच आऊटसाईडर शिवाजी सोहनी यांनी सरपंच यांच्याकडे आणून दिले आहे. याबाबत सरपंचांनी आमचेच टपाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे देण्याऐवजी परत आम्हालाच कसे देता? म्हणून विचारले असता ‘आम्हाला ते तुम्हाला देण्यासाठीच आले आहे’ असे सांगून हे टपाल माथी मारून आऊटसाईडर निघून गेला.
ग्रामपंचायतीमार्फत काही महत्त्वपूर्ण कामांबाबत वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला जात असतानाच काही महत्त्वाच्या टपालाबाबत पोस्ट खात्याकडून असे चुकीच्या पद्धतीने वितरण व दिरंगाई होत असल्यामुळे त्याचा ग्रामपंचायत कामकाजावर परिणाम होत असल्याची खंत सरपंच सौ.संगीता मासाळ यांनी व्यक्त करून पोस्टाच्या या ‘अजब कारभाराच्या गजब कहाणी’वर नाराजी व्यक्त केली.