हौसी-गवसी-नवसी यांच्यासह व्यापारी,जतकरही नाराज!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जतच्या श्री.यल्लमादेवी यात्रेकरिता प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केल्याने तसेच यात्रेत स्टाॅल, करमणूक ,कृषी प्रदर्शन व जनावरांच्या बाजारावर बंदी आणल्याने व्यापारी व अबालवृद्ध वर्गाची मोठी निराशा झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत नगरीची ग्रामदेवता, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री.यल्लमादेवीची यात्रा दि.३० डिसेंबर,२०२१ ते दि.५ जानेवारी,२०२२ अखेरपर्यंत भरणार आहे. गुरुवार दि.३० डिसेंबर रोजी देवीच्या गंधोटगीचा कार्यक्रम असून, शुक्रवार दि. ३१ डिसेंबर रोजी देवीला नैवेद्य अर्पण करण्याचा दिवस आहे. तर शनिवार दि. १ जानेवारी २०२२ रोजी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा व देवीचे किचाचा कार्यक्रम होणार आहे.
किच कार्यक्रमानंतर यात्रेची समाप्ती होऊन देवीचे मंदिराचे दरवाजे अमावस्येपर्यंत भक्तांना दर्शनासाठी बंद राहणार आहेत. अमावस्येला परत देवीचे मंदिराचे दरवाजा उघडल्यानंतर पुन्हा एकदा देवीची यात्रा भरत असून यावेळीही यात्रेत भक्तांची मोठी गर्दी राहणार आहे.
यावर्षी श्री. यल्लमादेवीच्या दि.३० डिसेंबर २०२१ ते दि.५ जानेवारीपर्यंत यात्रेच्या कालावधीत होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत करावे लागणार आहेत. यासाठी यात्रेत पोलीस प्रशासनाने बाहेरून मोठा पोलीस बंदोबस्त मागविला आहे, तर स्थानिक प्रशासनानेही यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी नियोजन सुरू केले आहे. श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठानही यात्रेकरूंसाठी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी कामाला लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जतची श्री. यल्लमादेवीची यात्रा गेली दोन वर्षे भरविण्यात आली नाही. यावेळीही प्रशासनाने श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतला यात्रा कालावधीत कठोर निर्बंध लागू केल्याने या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातून येऊन यात्रेत व्यवसाय करणा-या व्यापारी वर्गामध्ये मोठी निराशा पसरली आहे. कित्येक व्यापारी जत येथील श्री. यल्लमादेवीच्या यात्रेत मिळणारे उत्पनावर आपला वर्षाचा जमाखर्चाचा ताळमेळ बसवतात. परंतु गेली दोन वर्षे यात्राच न झाल्याने व्यापारीवर्ग कर्जबाजारी झाला आहे. यावर्षीही प्रशासनाने यात्रेकरीता कठोर निर्बंध लागू केल्याने व्यापारी वर्गामध्ये नैराश्य पसरले आहे.
यात्रेत मेवा-मिठाईची दुकाने, करमणूकीची साधने यामध्ये आकाशी पाळणे व अन्य पाळणे, तसेच विविध प्रकारचे करमणूकीचे खेळ याबरोबरच विविध व्यावसाईक यांचे स्टाॅल, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्यावतीने भरविण्यात येणारा जनावरांचा बाजार व कृषी प्रदर्शन या सर्वाला यात्रेत येणारे लोकांना मुकावे लागत असल्याने यात्रेकरीता येणारे भाविकांमध्येही मोठी नाराजी पसरली आहे.
श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी तर गेली दोन वर्षे यात्राच न भरल्याने श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत यांच्याकडून जी मंदिर परिसरात भक्तांच्या सोयी सुविधेकरीता कामे सुरू करण्यात आली आहेत,ती कामे थांबली आहेत. तसेच यात्राच बंद असल्याने यात्रेच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत चालली असून प्रतिष्ठान पुढे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने यात्रेकरीता कठोर निर्बंध लागू केल्याने प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
जतच्या श्री. यल्लमादेवीच्या यात्रेत प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केल्याने यावेळी जतकरांनी यात्रेकरिता जे नियोजन केले होते, ते नियोजन झाले नसल्याने जतकरांमध्येही यात्रेत करमणूक, स्टाॅल व जनावरे बाजार व कृषी प्रदर्शन बंदी आल्याने यात्रा असूनही नसल्यासारखीच अशी तीव्र प्रतिक्रिया उमठत आहेत.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद