शॉक लागून मृत वायरमनच्या कुटुंबास ₹ २ लाख आर्थिक मदत!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

अचकनहळळी (ता.जत) येथील वायरमन कै.लक्ष्मण तुकाराम कोळी यांच्या कुटुंबास विक्रम फौंडेशन जत,शिंदे परिवार व गावकरी यांचेवतीने २ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
कै.लक्ष्मण कोळी हे अचकनहळळी येथे गेल्या चार वर्षापासून वायरमन या पदावर काम करीत होते.लक्ष्मण कोळी हे अचकनहळळी गावामध्ये तात्या या नावाने परिचित होते. त्यांच्या स्वभाव अगदी मनमिळावू असल्याने गावातील प्रत्येक घरापर्यंत त्यांचे लहानापासून ते मोठ्यांंपर्यंत चांगले संबंध होते.
शुक्रवार दि.२६/११/२०२१ रोजी दुपारी ०१:०० च्या दरम्यान टी.सी.वर काम करीत असताना लक्ष्मण कोळी यांना शॉक लागला. ही बातमी कळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, राजू घाडगे यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय जत येथे आणले असता त्यांची जागेवरच प्राणज्योत मालवली होती. याची सविस्तर माहिती गावाचे उपसरपंच पिंटू स्वामी यांनी दिली.तातडीने जत ग्रामीण रुग्णालय गाठले आणि सविस्तर माहिती घेऊन संबंधित वीज वितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन शासकीय मदत देता येईल त्याबाबत सूचना दिल्या.
कै.लक्ष्मण कोळी यांच्या पश्चात तीन वर्षाचा लहान मुलगा ,सहा महिन्याची मुलगी,पत्नी ,आई, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. या कुटुंबाला मानसिक व आर्थिक आधार देणे गरजेचे होते. त्यामुळे गावातील गावकरी मंडळी व सामाजिक संघटना यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विक्रम फौंडेशन जत, तसेच शिंदे परिवार, गावकरी व मित्र मंडळी यांनी लक्ष्मण कोळी यांच्या कुटुंबास दोन लाख रुपये रोख रक्कम मदत देण्यात आली.