जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी: प्रकाशराव जमदाडे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, तसेच थकबाकीच्या नावाखाली महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून अनधिकृतपणे ट्रान्सफॉर्मरच बंद केला जात आहेत. हे त्वरित थांबवण्यात यावे या मागणीचे निवेदन सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक मोहन (भैय्या )कुलकर्णी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुका कायम दुष्काळी भाग आहे. गेल्या ४-५ वर्षापासून द्राक्षपीक नगदी पीक झाले आहे. जवळपास ६५०० एकर क्षेत्र आज द्राक्ष लागवडीखाली आहे. येथील द्राक्षे पूर्ण देशभर बेंगलोर, विशाखापट्टणम, कलकत्ता, दिल्ली इ. मोठ्या शहरात जात आहेत. तसेच अनेक शेतकरी बेदाणा (सुका मेवा) बनवत आहेत. परदेशातही बेदाणा निर्यात होतो. त्यामुळे द्राक्षपीक हा उद्योग निर्माण झाला आहे.
परंतु गेल्या १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने घड कुजणे, घडाची गळ होणे व दावण्या रोग यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी पचनामे करून शेतकऱ्यांस नुकसान भरपाई द्यावी.
गेल्या ४-५ दिवसांपासून थकबाकीच्या नावाखाली महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून अनधिकृतपणे ट्रान्सफॉर्मरच बंद केला जात आहे, हे अन्यायकारक आहे. जे शेतकरी थकबाकीदार आहेत, त्यांचे वीज तोडण्यास आमची हरकत नाही. परंतु ट्रान्सफॉर्मरची वीज तोडू नये असे निवेदनात म्हटले आहे.