जतमध्ये पत्रकार अनिल मदने यांचा असाही प्रामाणिकपणा!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
पत्रकार अनिल मदने हे नित्यनियमाप्रमाणे शनिवारी सकाळी सायकलिंगसाठी घराबाहेर पडले. यावेळी जत-येळवी रस्त्याने ते जात असताना काही अंतरावर गेल्यावर ते व्यायाम करण्यासाठी थांबले. त्यांना रस्त्याकडेला असलेल्या झुडपात मोबाईलच्या गाण्यांचा आवाज आला. यावेळी त्यांनी आजूबाजूला पाहिले असता त्यांना एक अनोळखी मोबाईल दिसून आला. या मार्गावर परिसरातील अनेक नागरिक रोज पहाटे व्यायामासाठी येत असतात.
मदने यांनी मोबाईल पडलेल्या ठिकाणी थांबून काही नागरिकांकडे विचारपूस केली असता हा मोबाईल विठ्ठलनगर येथील व्यावसायिक शंकर मराठे यांचा असल्याचे कळाले. काही वेळाने शंकर मराठे हे तेथे आले. मोबाईल त्यांचा असल्याची खात्री झाल्यावर अनिल मदने यांनी त्यांचा महागडा मोबाईल त्यांना प्रामाणिकपणाने परत केला. या गोष्टीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.