मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात आजचा तरुण हा ध्येयापासून दूर वहात जात असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महापुरुष आपणासमोर असताना आजच्या तरुणांनी आपले आदर्श आणि प्रेरणास्थान कोण असायला हवेत? याचा विचार करावा, असे आवाहन आटपाडी येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश विनायकराव पाटील यांनी आटपाडी येथे केले.
आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात आयोजित विधी साक्षरता शिबीरात ते बोलत होते.कोणत्याही संकटांशी न घाबरता छत्रपती शिवाजी महाराजांसारखे त्यातून मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, आजचा तरुण हा व्यसने आणि मोबाईल यांच्या आहारी जात असून अतिशय किरकोळ अशी त्यांच्या नैराश्याची कारणे आहेत. परंतु वयाच्या सुरुवातीस जरी अपयश आले, तरीही आपल्या आयुष्याचे विमान पुन्हा केव्हाही टेक अप करू शकते. तसेच मोबाईलकडे केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहण्याचे आणि छोट्या छोट्या कारणांमुळे खचून न जाता संकटाशी लढण्याची आपणा स्वतःमध्ये ताकद निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले, आयुष्यात जे सातत्याने प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात. महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये रँगिंगसारख्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.तसेच सायबर गुन्हे यांचे प्रमाण वाढत असून तरुणांची आयुष्य त्यामध्ये बरबाद होताना दिसून येत असल्याने रँगिंग आणि सायबर गुन्ह्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.
आजच्या तरुणांनी आभासी जगापासून दूर राहून वास्तवात जगून तरुणांनी मी कोण आहे? असा स्वतःचा शोध घ्यावा आणि एक चांगला आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्या आयुष्याची वाटचाल करणेबाबत त्यांनी याप्रसंगी तरुणांना मार्गदर्शन केले.

पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी पोक्सो कायदा आणि मोटार वाहन कायदा याबाबत कायदेविषयक माहिती दिली. याप्रसंगी बोलताना त्यांनी सध्याच्या काळातील स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा असून मोबाईल हाच आपल्या करिअरमधील सर्वात मोठा अडथळा आहे. परंतु कॉलेजच्या जीवनातच ठरवले तर यशापर्यंत आपण निश्चितपणे पोहोचू शकत असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
प्रा.संताजी लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे व्यवस्थापन न्यायालयीन कर्मचारी अधिकराव घाडगे यांनी केले.यावेळी आटपाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.सी.व्ही.जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे, ॲड.पी.जी.शिंदे,ॲड.व्ही.बी.सावंत,प्रा.विजय शिंदे, प्रा.संजय हजारे, संजय बाबर, श्रीधर कवडे,आदि मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद