कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लस हेच सुरक्षाकवच- सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समिती आटपाडी कडून मिशन कवच कुंडल covid-19 लसीकरण अभियान 2021 या विषया अंतर्गत लिंगेवस्ती आटपाडी येथे सभा घेण्यात आली. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लस हेच सुरक्षा कवच आहे. त्यामुळे लस घेऊनच आपण कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो. यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल हे अभियान सर्वत्र राबविण्यात येत आहे. सर्व अठरा ते 45 वयोगटातील लोकांनी लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन आटपाडीच्या सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी केले. तसेच डेंगू,मलेरिया व हिवताप या साथीच्या रोगांपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, साठलेल्या पाण्यात गप्पी मासे पाळणे व स्वच्छतेचा अवलंब करणे या गोष्टींबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन आशासेविका सौ.दिपाली महामुनी व लिंगेवस्ती जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सर्जेराव मारुती पुजारी यांनी केले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय पोस्ट विभाग व ग्रामपंचायत आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडी ग्रामपंचायत येथे सुरू असलेल्या आधारकार्ड कॅम्पबाबत माहिती दिली व या मोहिमेमध्ये सहभागी होऊन नवीन आधार कार्ड मोफत काढून घ्यावे, असे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केले.
तसेच समृद्ध गाव योजनेअंतर्गत लखपती किसान गांडूळ खत निर्मिती व विविध पिकांच्या लागवडी संदर्भातील या योजनांचा आढावा घेतला. उपस्थित महिलांना ग्राम संघामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केले. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी व रोजगार निर्मितीचे संकल्पना राबविणेकामी अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणेकामी महिलांना प्रोत्साहन दिले.
तसेच समिती सचिव सुमया मुरसल व सौ. मनीषा नानासो पाटील यांनी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला व मिशन कवच कुंडल योजना सफल होणेकामी लसीकरणासाठी आग्रह धरला.
यावेळी पंचक्रोशीतील माता-पालक, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच सर्व आशासेविका उपस्थित होत्या. यावेळी सरपंच यांनी महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यबरोबरच आपले वैयक्तिक आरोग्यही तंदुरुस्त राखावे व सामाजिक स्वास्थ्यासाठी अग्रेसर राहावे यासाठीही महिलांना प्रेरित केले.