संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
स्पंदन प्रतिष्ठान माळशिरस या सेवाभावी संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या तसेच सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयात प्रवेश मिळालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा व आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
मंत्रालयातील बांधकाम विभागाचे अवर सचिव गणेश कचरे, तालुक्याचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,अकलूज येथील प्रसिद्ध डॉक्टर समीर दोशी, उपशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, प्राचार्य फडतरे व गेजगे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
स्पंदन प्रतिष्ठान दरवर्षी अशा यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करते.गेल्या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे ते स्थगित करण्यात आले होते.यावर्षी दोन्ही वर्षाचे सन्मान एकत्रित आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या शुभम जाधव व राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या अजिंक्य खरात व अमोल शिंदे या बरोबरच सैनिकी शाळा प्रवेश पात्र ९ विद्यार्थी व नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या २८ विद्यार्थ्यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. याचबरोबर स्पंदन प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार दत्तात्रय माने (जिल्हा परिषद शाळा तुपेवस्ती) व सौ.सारिका जामदार (जिल्हा परिषद शाळा, पिलीव) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, स्पंदन प्रतिष्ठानचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यश वाखाणण्याजोगे असून स्पंदन परिवाराचे कार्य गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार गटविकास अधिकारी खरात यांनी काढले.तर पुढील वर्षी याहीपेक्षा घवघवीत यश संपादन करून अनेक विद्यार्थी स्पंदन परिवाराच्या सन्मानास पात्र ठरतील,असा विश्वास व्यक्त करून गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट जवळपास ५०० ने वाढल्याचे धनंजय देशमुख यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल करचे यांनी स्पंदन प्रतिष्ठानच्या गेल्या सहा वर्षाच्या कार्यकालाचा आढावा घेवून भविष्यात प्रतिष्ठानच्या वतीने करावयाच्या समाजोपयोगी कार्याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमास स्पंदन प्रतिष्ठानचे गुरुवर्य राऊत, ढाले ,वेर्णेकर,पवार व प्रतिष्ठानचे सदस्य अशोक वाघमोडे, सतीश दडस,संजय शेंडगे, नगरसेवक आप्पासाहेब देशमुख, शिवाजी माने, संतोष कुंभार, काकासाहेब खंडागळे, जयसिंग साळवे, सचिव डॉ.शाम वाघमोडे, बाळासाहेब नामदास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक आत्माराम गायकवाड व प्रसाद पारेख यांनी केले व आभार आप्पासाहेब देशमुख यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद