ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शंकररावजी खरात यांचे आटपाडी येथे स्मारक उभारण्याची मागणी

साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शंकररावजी खरात यांचे त्यांच्या जन्मगावी आटपाडी येथे जन्मशताब्दी वर्षांमध्ये उचित व भव्य स्मारक करण्यात यावे, याबाबतची मागणी साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावचे महान सुपुत्र थोर साहित्यिक डॉ.शंकररावजी खरात जागतिक कीर्तीचे विचारवंत होते.तसेच ते नामवंत ज्येष्ठ साहित्यिक, अनेक कथा-कादंबरीकार, समीक्षक, ‘तराळ अंतराळ’चे महान लेखक होते.डॉ.शंकरराव खरात यांचे मराठी साहित्यामध्ये मोठे योगदान आहे.
सन १९८४ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचे ते कुलगुरु होते. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मानाने डि.लिट. ही पदवी दिली आहे. अनेक केंद्रीय कमिटी व राज्य कमिटीचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आलेले होते.
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद घटनेच्या मसुद्याचे काम करण्याची जबाबदारी शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्यावर सोपवली होती.
डॉ.शंकररावजी खरात यांचे आत्मचरित्र ‘तराळ अंतराळ’ हे सामाजिक जीवनातील विषमतेचे चित्रण घडवणारे म्हणून लोकप्रिय ठरले. देश-विदेशातील अनेक भाषात त्यांच्या आत्मचरित्राला गौरवण्यात आले. सामाजिक विषमता, सामान्यांच्या कथा, व्यथा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्रबोधनकारी लेखन केले. संत साहित्यातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
या महान साहित्यिकाचा जन्म आटपाडी येथे ११ जुलै १९२१ रोजी झाला व त्यांचे महानिर्वाण ९ एप्रिल २००१ रोजी झाले. त्यांच्या कार्याच्या स्मृती जतन करणेकामी त्यांचे उचित व भव्य स्मारक होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांची, साहित्य प्रेमींची व माणदेशातील जनतेची आग्रहाची प्रामुख्याने मागणी आहे.
वास्तविकता महाराष्ट्र दलित साहित्याचे मानबिंदू असणारे व महाराष्ट्राला नव्या वाडःमयीन कृतीची ओळख करून देणारे साहित्य इतिहासातील सुवर्णपान म्हणजेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शंकररावजी खरात आहेत.
डॉ.शंकररावजी खरात यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या महान साहित्यिकाचे त्यांच्या जन्मभूमी आटपाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या साहित्याचा ठेवा चिरंतर ठेवण्यासाठी उचित व भव्य स्मारक उभा करावे.याबाबतची मागणी प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडेही मागणी करण्यात आली आहे.