राजेवाडी येथील काळामळ्यातून तिघाजणांच्या शेती साहित्याची चोरी !

अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
राजेवाडी येथील काळामळा शेतातील एसटीपी व सिंगल फेज मोटरसह शेती उपयोगी विद्युत व इतर साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद जयकुमार गंगाधर शिरकांडे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे.त्यांचे ह्यासपी कंपनीचा एसटीपी व २ एचपी सिंगल फेज मोटर असे ८ हजार रुपयांचे, शिवाजी बलभीम श्रीखंडे यांच्या विहिरीवरील ५ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक तांबूस रंगाची स्टार्टर पेटी आणि जीवन कृष्णा शिरकांडे यांच्या मोटरीचा ऑटोस्टार्टर, गण पाईप,२०० लिटरचा बॅरेल व तीन इंची वॉल असे ५ हजार रुपयांचे असे एकूण १८ हजार रुपये किंमतीचे शेती उपयोगी साहित्य चोरून नेले आहे.
जयकुमार शिरकांडे ३० सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काळामळा येथील शेतातील ऊसाला पाणी देत होते.त्यावेळी त्यांनी गट नंबर ४९८ मध्ये असलेल्या विहिरीजवळ ठेवलेले एसटीपी व मोटार असल्याचे पाहिले. त्यानंतर ते रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ऊसाला पाणी देऊन झाल्यानंतर घरी गेले व दुसऱ्या दिवशी सकाळी १ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता पाणी देण्यासाठी आले.त्यावेळी त्यांना एसटीपी व सिंगल फेजची मोटर दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शेतात शोध घेतला असता कोठेही सापडले नसल्यामुळे त्यांनी घरी येऊन सर्वांना हा प्रकार सांगितला. शिवाजी बलभीम शिरकांडे यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक स्टार्टर पेटी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जीवन कृष्णा शिरकांडे यांच्या मोटरचा ॲटो स्टार्टर, गण पाईप,२०० लिटरचा बॅरेल व तीन इंची वॉल नसल्याचे सांगितले.याचा शोधाशोध परिसरात केला, परंतु त्यांना ते साहित्य आढळून आले नाही. त्यावरून हे साहित्य चोरीला गेल्याचे खात्री झाल्यानंतर जयकुमार गंगाधर शिरकांडे यांनी याबाबतची फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये दिली आहे. यामध्ये एकूण १८ हजार रुपयांचे शेती उपयोगी साहित्य चोरीला गेले आहे. याचा तपास हवालदार संतोष जाधव करीत आहेत.