गोमेवाडीत पत्नीने केला पतीचा खून !

नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे पत्नीने पतीचा दगडाने ठेचून व चाकूने मारून खून केल्याची घटना आज घडली. याबाबत आरोपी पत्नी वैशाली श्रीकांत खरात (वय ३५ वर्षे, रा.गोमेवाडी ता. आटपाडी जि. सांगली ) हिला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पती श्रीकांत श्रीपती खरात (वय ४४ वर्षे, रा.गोमेवाडी ता. आटपाडी जि. सांगली, मूळगाव – तासगाव) हा पत्नी वैशाली हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन घरातील चाकू घेऊन मारण्‍यासाठी आला.पत्नी वैशाली हिने त्याच्या हातातील चाकू घेत असताना दोघांमध्ये झटापट झाली.वैशाली हिने पतीच्या हातातील चाकू घेऊन त्या चाकूने पतीच्या पायावर मारून त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावर घडली. पतीचा खून केल्याच्या आरोपाखाली पत्नी वैशाली हिला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शामराव दामोदर पाटील यांनी आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये दिली. विटा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गोसावी घटनेचा पुढील तपास करीत आहेत.