शिंगोर्णी येथे माळशिरस पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,इतर गुन्हेही उघड!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस :
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथे नरळेवस्ती परिसरात बोलेरो गाडीतून संशयीतरित्या फिरणाऱ्या दोघा अट्टल दरोडेखोरांना गावठी पिस्टलसह पोलिसांनी जेरबंद केले.मात्र त्यांच्यातील तिसरा आरोपी शेजारील शेतात पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. माळशिरस पोलिसांनी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्याकडून अन्य काही गुन्हेही उघड केले आहेत.
शिंगोर्णी गावामध्ये एक चॉकलेटी रंगाची बोलेरो गाडी व त्यामध्ये तीन इसम संशियतरित्या फिरत आहेत अशी माहिती माळशिरस पोलीसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व घोळकर, पोलीस कर्मचारी यांनी शिंगोर्णी गावच्या हद्दीतील नरळेवस्ती येथील उसाच्या शेताजवळ सापळा लावला.नरळेवस्ती येथे बोलेरो गाडी ताब्यात घेत असताना जीपमधील शिंगोर्णी गावातील सराईत गुन्हेगार जीपमधून उतरुन शेजारील शेतात पळून गेला.मात्र जीपगाडीस पोलिसांनी गराडा घातला.त्यावेळी निफाड नाशिक येथील एक व गंगापुर औरंगाबाद येथील एक आरोपी सापडले.या आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल,एक चाकू जप्त करण्यात आला. आरोपींकडे असलेली बोलेरो जीप नं एम एच १४ एझेड ७८९८ ही गाडी जागीच जप्त करण्यात आली. या बोलेरो जीप गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन कापडाच्या गोण्या आढळल्या. त्यामध्ये नवीन शर्ट पॅन्ट, लहान मुलांच्या कपड्याच्या दोन गोण्या मिळून आल्या. तसेच गाडीमध्ये एक लोखंडी कटावणी,एक लोखंडी कोयता आढळले.माळशिरस पोलीस ठाणेत शस्त्र अधिरिनयम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याच्या तपासामध्ये एक चॉकलेटी रंगाची बोलेरो जीप नं एम. एच १४ एझेड ७८९८ या वाहनाबाबत पोलिसांनी चौकशी केली.या वाहनाचा नंबर डुप्लीकेट असलेबाबतची त्यांना माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने तपास केला असता या आरोपीने धुळे येथून चोरुन आणलेली असल्याचे सांगितले.पोलीस ठाणेस चौकशी केली असता हे वाहन चोरुन नेले असलेबाबत देवपुर पश्चिम पोलीस ठाणे, धुळे गुरनं २७१/२०२१ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. गाडी चोरीचा हा गुन्हा उघडकीस आला आहे.
आरोपींकडे जप्त करण्यात आलेल्या कपड्याच्या बाबतीत तपास केला असता त्यांनी आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील दिघंची-आटपाडी रोडवरील जयभवानी कलेक्शन दुकान फोडून कपड्याची, रोख रक्कम चोरी केली असल्याचे सांगितले.
या आरोपींनी नाशिक निफाड येथुन चोरुन आणलेली एक बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली असुन निफाड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील गेला माल असल्याने हाही गुन्हा उघडकीस आला आहे.
हे आरोपी अट्टल दरोडेखोर असुन त्यांचेविरुध्द धुळे, नाशिक, सांगली, अहमदनगर जिल्ह्यामध्ये घरफोडी, दरोडे यासारखे गुन्हे दाखल आहेत. यातील एक आरोपी हा ३ वर्षे कारावासाची शिक्षा भोगून आला आहे.हे आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांचेकडून नाशिक,धुळे,अहमदनगर जिल्हयातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपी हे त्यांच्या गावापासून दूरच्या ठिकाणी येवून घरफोडी, जबरी चोरी करण्यात सराईत आहेत.या आरोपींची गोपनीय माहिती काढून आरोपी जेरबंद करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल दत्ता खरात यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके करीत आहेत.
सोलापुर ग्रामिणच्या पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव,अकलुज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व सहायक पोलीस निरीक्षक नितीन घोळकर, तुळशिराम गायकवाड,पंडीत मिसाळ,सुशिल साळुंखे,वैभव लेंढवे, राहुल वाघ, दत्ता खरात,सोमनाथ माने,सतिश धुमाळ, अन्चर आतार (सायबर), होमगार्ड संतोष शिंदे यांनी ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या