
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
माळशिरस तालुक्यात ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत हातभट्टीची दारु काढून विक्री करणाऱ्यांवर १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १९ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.तर तीन हातभट्टी चालकांचे मतपरिवर्तन करून त्यांचा माळशिरस पोलिस ठाण्यामध्ये सत्कार करण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत ऑपरेशन परिवर्तन राबवण्यात येत आहे. माळशिरस पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये १ ते ३० सप्टेंबरपर्यंत ऑपरेशन परिवर्तन राबविण्यात आले.
हातभट्टीची दारू काढणे, विक्री केल्याबाबत १५ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये १९ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ११ हजार ४९० लीटर हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचे रसायन व ४८५ लीटर हातभट्टीची दारू असा ५ लाख २७ हजार ४२० रुपयांचे तसेच हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट करण्यात आलेले आहे.
या ऑपरेशन अंतर्गत तालुक्यातील तीन इसमांचे मतपरिवर्तन घडवून आणण्यात आले आहे. त्यांनी हातभट्टीची दारू न काढण्याचा ‘पण’ केला आहे व उपजीविकेसाठी इतर व्यवसाय सुरू केले आहेत. पोलीस ठाण्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.
पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व घोळकर तसेच अजिनाथ महारनवर यांनी चांदापुरी,पठाणवस्ती,पिलीव,बचेरी,सुळेवाडी ही गावे दत्तक घेतली आहेत. परांडे, गायकवाड, मिसाळ, लेंडवे, भोसले, खरात, धुमाळ, गायकवाड, अन्सारी, माने या पोलिस कर्मचार्यांच्या मदतीने ऑपरेशन परिवर्तन सुरू आहे.
हातभट्टीविरोधी कारवाईमुळे बिगरजामीनाचा व सेशनकमिट गुन्हा दाखल केला जात असल्यामुळे हातभट्टी व्यवसाय करणारे लोक चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी हातभट्टी दारू काढण्याचा व्यवसाय सोडून शेती तसेच अन्य पारंपरिक व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद