माळशिरस शहरात चोरटे होणार आता कॅमेऱ्यात कैद!

माळशिरस शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे लोकवर्गणीतून पुन्हा झाले सुरु!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस शहरामध्ये एकूण १६ सी सी टी व्ही कॅमेरे यापूर्वी बसवण्यात आले होते. परंतु ते कॅमेरे दुरुस्ती व देखभालीअभावी बंद पडलेले होते. सध्या माळशिरस शहर तसेच परिसरामध्ये माला विषयक गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची खूप मदत मिळत असते. माळशिरस पोलीस ठाण्याच्यावतीने पुढाकार घेवुन सी सी टी व्ही कॅमेरे सुरू करण्याबाबत गावातील प्रतिष्ठीत नागरिकांची मिटींग घेवून त्यांना सी सी टी व्ही कॅमेरे सुरू असणे कसे फायद्याचे तसेच किती आवश्यक आहे हे पटवून सांगितले व नागरिकांना सी सी टी व्ही कॅमे-यांचे महत्व पटल्यामुळे नागरीकांनी लोकवर्गणीमधून सी सी टी व्ही कॅमेरे दुरुस्त करण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे माळशिरस शहरातील नागरिकांनी लोकवर्गणी करून तात्काळ एकुण २२ हजार रूपये जमा केले आहेत. नागरीकांनी जमा केलेल्या या रक्कमेतुन सी सी टी व्ही कॅमेरे दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. लवकरच १६ सी सी टी व्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वीत होत आहेत. तसेच लोकवर्गणीतून आणखी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.