प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी येथील अशिक्षित व चहा टपरी चालविणारे नामदेव बालटे यांचा मुलगा चार्टर्ड अकौंटंटची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे.
आटपाडी येथील दिघंची रोडवर नामदेव बालटे हे ओमरत्न टी स्टॅाल या नावाने चहाची टपरी चालवतात.यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नामदेव बालटे यांचा मुलगा व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उत्तम बालटे यांचे लहान बंधु संतोष बालटे यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतले.त्यांनी अनेकवेळा आलेल्या अपयशाचा व खडतर परिस्थितीचा सामना केला.खचून न जाता वेळप्रसंगी मजूरी करून,आई वडिलांचे स्वप्न व कष्ट वाया जाऊ न देता अहोरात्र अभ्यास केला.अखेर त्यांनी चार्टर्ड अकौंटंट ही परिक्षा उत्तीर्ण होऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.घरच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी हे यश संपादन केले.
कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये चार्टर्ड अकौटंट परिक्षा यश संपादन करणा-यांची संख्या कमी असताना ही परिक्षा उत्तीर्ण होऊन संतोष बालटे यांनी सर्वसामान्य कुटूंबातुन सुध्दा खडतर परिश्रम व
सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश मिळते, हे सदरची परिक्षा देत असलेल्या तरूणांना उत्तम उदाहरण आहे. त्याचा आदर्श विदयार्थ्यांनी घेण्यासारखा आहे. संतोष बालटे यांच्यारूपाने तालुक्याला चार्टर्ड अकौंटंटची भर पडली आहे.
आई-वडिल अशिक्षित असताना देखील सर्वसामान्य कुटूंबातुन जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केल्यामुळे त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद