भोंदू मनोहरमामा भोसलेला पोलिसांनी पकडले!

लैंगिक अत्याचार,फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस होते शोधात ! सातारा येथे घेतले ताब्यात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सातारा:
संत बाळूमामाचा अवतार असल्याचे भासवून अनेकांची आर्थिक लूट करणाऱ्या व गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या मनोहर (मामा) भोसले (वय ३९, रा. उंदरगाव ता. करमाळा जि. सोलापूर) यास पुणे ग्रामीण पोलिसांनी व बारामती तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने सातारा येथून ताब्यात घेतले आहे. मनोहर भोसले यास बारामती येथे नेण्यात येणार आहे.
मनोहर (मामा) भोसले याच्यासह ओंकार शिंदे व विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा या तिघांंविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात
फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा,जादूटोणा आणि उच्चाटन कायदा (आक्षेपार्ह जाहिराती) तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती येथील फिर्यादी शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर,कसबा ता. बारामती जि. पुणे) यांच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले व त्याच्या साथीदारांनी खरात यांच्या वडिलांच्या गळ्यातील थायरॉईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, ओंकार शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीवाची भीती घालत खरात यांच्याकडून २ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच,
करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर (मामा) भोसले याच्यावर भादंवि कलम ३७६(ड),३७६(एन), ३५४ व ३८५ आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या होत्या.पुणे ग्रामीण पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणून अटक केली जाणार आहे.
अलीकडे मनोहर भोसले यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.उंदरगाव येथील भोसले याच्या संत बाळूमामा यांच्या नावाने असलेल्या मंदिर/मठामध्ये भाविकांकडून बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला होता. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.भोसले याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यातच एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल केला.तसेच बारामती येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसले याच्या अटकेसाठी पोलिस रवाना झाले होते.