लाचप्रकरणी पाणीपुरवठा अभियंत्यासह खाजगी प्लंबरला अटक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ ठाणे:
वर्क ऑर्डर काढण्यासाठी केडीएमसी महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह खाजगी प्लंबरला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज आणि खाजगी प्लंबर रवींद्र डायरे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवार दिनांक ७ रोजी डोंबिवली विभागीय कार्यालयात ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की,तक्रारदार हे प्लंबिंगची कामे करतात. एका व्यक्तीने त्यांच्याकडे नवीन घराकरिता पिण्याच्या पाण्याचे नवीन नळजोडणी महापालिकेकडून मंजूर करून देण्याचे काम दिले होते. त्याप्रमाणे केडीएमसीचे प्रभाग फ आणि ग मधील पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता वाळंज याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये चार हजार रुपये देण्याचे ठरले.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पंचासमक्ष चौकशी केली असता वाळंज याने लाख स्वीकारण्याचे मान्य करून खाजगी प्लंबर डायरे यांच्याकडे रक्कम देण्यास सांगितले.यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने सापळा रचला.डायरे याला लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले.
कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याच्या घटनेला २४ तास होत नाहीत, तोपर्यंत वर्क ऑर्डर काढण्यासाठी लाच मागणार्‍या मनपा पाणीपुरवठा विभागातील या अभियंत्यासह प्लंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केल्याने व एकीकडे विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू असताना लाचेची ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.