
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जालना:
जालना येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी-महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील अतिरीक्त कार्यकारी अभियंत्यांसह त्याच्या खाजगी वाहनचालकास वीज बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कंत्राटदाराकडून ३० हजार रुपये लाच घेताना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.त्यांना अटक केल्यानंतर महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कार्यकारी अभियंता रेवानंद लक्ष्मण मोरे आणि खासगी वाहनचालक दीपक रतन नाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार हे सोलर पॅनल बसवून देण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला जास्त बिल आले होते. या बिलाची रक्कम कमी करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता मोरे यांची भेट घेतली.तेव्हा त्यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ.राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली.मंगळवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सापळा रचला.
तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन मोरे यांच्याकडे पाठविण्यात आले. मोरे याने लाचेची रक्कम त्याचा खासगी वाहनचालक दीपक नाडे याच्याकडे देण्यास सांगितले. मोरे याच्या सांगण्यावरून नाडेने तक्रारदार यांच्याकडून लाचेचे ३० हजार रुपये स्वीकारले.साध्या वेशातील दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले.त्यानंतर मोरे यासही ताब्यात घेतले.याप्रकरणी जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या