मंडल अधिकाऱ्यासह संगणक ऑपरेटरवर ‘अँटी करप्शन’ची कारवाई !

निकाल बाजूने देण्यासाठी मागितली ७० हजाराची लाच; २५ हजार स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडले!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
मिरज तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकून व कुपवाड,सांगली,बुधगाव येथील मंडल अधिकारी श्रीशैल उर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी व कार्यालयातील संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की,तक्रारदार यांची आई वारसदार असलेल्या जमीनीच्या संदर्भात मंडल अधिकारी घुळी याच्यासमोर सुरू असलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडल अधिकारी घुळी व कार्यालयात काम करणारा खाजगी,संगणक ऑपरेटर समीर जमादार यांनी ७० हजार रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार अर्जाद्वारे २८ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २९ व ३० ऑगस्ट तसेच १ व २ सप्टेंबर रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली.त्यामध्ये तक्रारदार जमिनीसंदर्भातील तक्रारीच्या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडल अधिकारी घुळे याच्या सांगण्यावरून कार्यालयात काम करीत असलेला समीर जमादार याने तक्रारदाराकडे ७० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी २५ हजार रुपये देण्यास सांगून उर्वरित ४५ हजार रुपये निकाल लागल्यानंतर देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सांगली येथील राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालय या ठिकाणी सापळा लावला. संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार (वय ३६ वर्ष रा.ग्रामपंचायतजवळ, मल्लेवाडी, ता.मिरज) याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर त्यास पकडण्यात आले. तहसील कार्यालय,मिरज येथे पुरवठा अव्वल कारकून या मूळ पदावर व कुपवाड,सांगली,बुधगाव येथील मंडल अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या श्रीशैल उर्फ व श्रीकांत विश्वनाथ घुळी (रा.शिवाजीनगर,दंडोबा रस्ता, मालगाव ता.मिरज) यास ताब्यात घेतले आहे.त्यांच्या विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रितम चौगुले, भास्कर भोरे, राधिका माने,विना जाधव, श्रीपती देशपांडे,चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्पलाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हाट्सअप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.