बाळूमामा मंदिराला कुलूप! मनोहरमामाही ‘नॉट रिचेबल’!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /करमाळा:
संत बाळूमामा यांच्या वंशजावरून कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यामध्ये वाद सुरू झाला असतानाच करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील बाळूमामाच्या मंदिराला कुलूप लावण्यात आले आहे. तर तेथील मनोहर मामा भोसले आता उंदरगावमध्ये दिसेनासे झाले आहेत.
‘स्वत:ला आदमापूरच्या संत बाळूमामांचा वंशज, अवतार म्हणविणारे उंदरगाव येथील मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा बाळूमामा आपल्याला प्रसन्न असून त्यांच्या आशीर्वादाने अनेकांचे प्रश्न मार्गी लागतात,असा त्यांचा दावा होता. आपल्या चेल्यामार्फत याचा पद्धतशीर प्रचार करून मनोहर भोसले याने आपण महाराज असल्याची ख्याती निर्माण केली.त्यातून समस्यांग्रस्त जनतेला संकट दूर करतो,असे सांगून जाळ्यात ओढल्याची चर्चा आहे.यातून सुटण्यासाठी अमावास्या, पौर्णिमेला उंदरगावातील बाळूमामाच्या मंदिरात अनेकांना खेटे घालावयास लावले. त्यातून त्यांनी बक्कळ अर्थप्राप्ती केल्याची चर्चा आहे.मनोहर भोसले यांच्या कारनाम्याला भुलून अनेक नामांकित नेत्यांनी उंदरगावात त्याच्यासमोर लोटांगण घातले. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधिकच वाढत गेले. त्यांच्याबद्दल तक्रारी वाढल्याने उंदरगावातूनच त्यांना विरोध होत आहे.करमाळा तालुक्यातील उंदरगावात महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, अहमदनगर, लातूर, पुणे, मनमाड, भुसावळ तसेच कर्नाटकातीलही भक्तगणांची रीघ लागत असे’, असे त्यांच्या बद्दल आरोपाचे वातावरण तयार झाले आहे.
मनोहर महाराजाच्या अंधश्रद्धायुक्त कारनाम्याने बाळूमामांचे मूळ समाधी असलेल्या आदमापुरात त्याचा निषेधाचा ठराव करून भक्तगणांनी फसू नये,असे आवाहन केले आहे.आता उंदरगावमध्ये ते दिसेनासे झाले आहेत. उंदरगावातील मनोहरमामा याने उभारलेल्या बाळूमामांच्या मंदिराला कुलूप लावले असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.मनोहरमामा नॉट रिचेबल असून पुण्यात मुक्कामाला असल्याची चर्चा आहे.त्यामुळे उंदरगावात आता सन्नाटा पसरला आहे.दरम्यान, येत्या दोन दिवसात ते उंदरगावला परतणार असल्याचेही काहीजणांकडून समजते.
‘मनोहर भोसलेंचा फोटो काढा’
एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील मनोहर भोसले यांचा फोटो त्वरित काढा; अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू व मालिका प्रसारण बंद पाडू, असा इशारा आदमापूर ग्रामस्थांसह बाळूमामा भक्तांनी दिला आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने तशी मागणी करणारे पत्र निर्माता संतोष आयाचित यांना पाठवले आहे.याबरोबरच बाळूमामा देवालय समितीच्या वतीनेही भोसले यांचा निषेध करण्यात आला आहे.