


सोलापुरात आढळला अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सोलापूर :
सोलापूर शहरातील डीआरएम रेल्वे कार्यालयाजवळ अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग आढळून आला आहे.
सोलापूर येथील डीआरएम रेल्वे ऑफिसच्या समोरच्या गेटमध्ये कर्मचारी संदीप पैकेकरी यांना हा साप दिसला. त्यांनी त्याला पकडण्यासाठी पाण्याची रिकामी बाटली घेतली व त्यात सुरक्षितपणे सापाला पकडले. तो साफ वेगळाच दिसत असल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. त्यांनी त्याचे फोटो डब्ल्यूसीएएसचे सदस्य रोहन तोडकरी आणि संतोष धाकपाडे यांना पाठवले. पकडलेला साप पैकेकरी यांनी सुरेश क्षिरसागर व सोमानंद डोके यांच्याकडे सुपूर्द केला. वाईल्ड लाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरच्या सदस्यांनी त्या सापाचे नीट निरीक्षण केले. तेव्हा तो साप नाग या प्रजातीचा असल्याचे समजले.
या सापाचे फोटो सर्प अभ्यासक वरद गिरी यांना पाठवले व सापाबद्दल माहिती घेतली. काही ठराविक सापांच्या शरीरावर खवले तयार होत नसतात. अशा सापांच्या अंगावर त्वचा असते,परंतु खवले नसतात. अनुवंशिक बदल अर्थात जेनेटिक डिसऑर्डरमुळे अशा घटना शंभरात एखाद्या सापांमध्ये घडतात, असे वरद गिरी यांनी सांगितले.
ही माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना दिली व त्या सापाची नोंद वन विभागाकडे करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी वनरक्षक (विशेष सेवा) श्रीशैल पाटील, अजित चौहान, संतोष धाकपाडे, सुरेश क्षिरसागर,सोमानंद डोके, मयांक चव्हाण, रोहन तोडकरी, संदीप पैकेकरी, निरंजन मोरे यांनी या सापाच्या बचाव मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
प्रत्येक सापाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे खवले असतात. सर्व सापांच्या शरीरावर शुष्क व खरबरीत खवल्यांचे आवरण असते. हे खवले केराटीन यापासून तयार झालेले असतात. साप स्वतःची त्वचा कात टाकून नियमित बदलत असतो. त्यावेळी त्याच्या हालचाली मंद होतात, तसेच त्यास डोळ्याने दिसत नाही. वरची त्वचा पूर्णपणे निघून गेल्यानंतर दुसरी नवी त्वचा तयार होते. कात टाकण्याची ही क्रिया ठराविक काळानंतर पुन्हा-पुन्हा होत असते. साप वर्षभरात एकापेक्षा अधिक वेळा कात टाकतो. त्यामुळे त्यास चपळता प्राप्त होते.अनुवंशिक बदलामुळे या प्रकारचा खवले नसलेला साप फार कमी वेळा पाहायला मिळतो.


संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक