चिमुकलीच्या गळ्याला मध्यरात्री झोपेत कोब्राचा विळखा!

काळजाचे पाणी करणारी घटना!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /वर्धा:
मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या सात वर्षाच्या एका चिमुरडीला विषारी कोब्राने गळ्याला दोन तास विळखा घातला.हालचाल केल्यानंतर तिच्या हातावर दंश केला.मध्यरात्री थरकाप उडवणाऱ्या या घटनेने घरातील सर्वांच्याच काळजाचे पाणी झाले.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात झडशी गावाशेजारी बोरखेडी कलामध्ये ही धक्कादायक व थरकाप उडवणारी घटना घडली.गडकरी कुटुंबीय मध्यरात्री गाढ झोपेमध्ये होते.वडिलांच्या शेजारी सात वर्षाची लहान मुलगी झोपली होती. अचानक मध्यरात्री नागाच्या फुत्कारण्याचा आवाज आला.त्यामुळे तिचे वडील जागे झाले. त्यानंतर त्यांनी जे पाहिलं,त्यामुळे त्यांच्या काळजाचे पाणीच झाले. सात वर्षाच्या या चिमुरड्याच्या गळ्याला कोब्राने वेटोळे घातले होते. वडील जागे झाल्यानंतर मुलीनेही डोळे उघडले.त्यावेळी “हालचाल करू नको, अशीच शांत पडून स्थिर राहा” असे आई-वडील मुलीला सांगू लागले. गळ्याला विळखा घातल्यामुळे कोणाचाही इलाज चालेनासे झाले. हा कोब्रा मुलीच्या मानेला तब्बल दोन तास विळखा घालून बसला होता.त्यामुळे या चिमुकलीला जास्त वेळ सहन होईनासे झाल्यानंतर हालचाल केली, त्याचक्षणी त्याने तिला दंश केला. दरम्यानच्या कालावधीमध्ये घाबरलेल्या आई-वडिलांनी सर्प मित्राला पाचारण केले. सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. मात्र तो कोब्रा पसार झालेला होता, नंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. सात वर्षाच्या चिमुकलीने मोठ्या धीराने हा सामना केला. त्यामुळे तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे. मात्र तिच्या हातावर दंश केल्यामुळे तिला सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.