


बलात्कारातील तिघा आरोपींंना अटकपूर्व जामीन मंजूर !
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे.ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले, म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही. विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर लैंगिक संबंध ठेवले म्हणून लग्न करणे बंधनकारक नाही, असा निर्वाळा देत न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली.तक्रारदार महिलेचे एका आरोपीवर प्रेम होते. आरोपीने तिच्याशी विवाह केला नाही. त्याने विवाहाचे आमिष दाखवून तिच्याकडून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सहमती घेतली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. अटक होईल या भीतीने आरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.दरम्यान यावरून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.एम.गुप्ता यांनी हा निर्वाळा दिला आहे.
न्या. गुप्ता यांनी म्हटलं आहे की, कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले, म्हणून त्यांनी लग्न करणे बंधनकारक नाही, असं निरीक्षण न्या. गुप्ता यांनी नोंदवलं आहे.
सत्र न्यायालयाने हा एक महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. यामध्ये दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकमेकांत गुंतल्या म्हणून त्यांनी एकमेकांशी विवाह करणे बंधनकारक नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाकडून बलात्काराचा आरोप असलेल्या तिघांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
‘तक्रारदार ही सज्ञान आहे, सुशिक्षित आहे. त्यामुळे विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव तिला आहे. आपली फसवणूक करून सहमती घेण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. मात्र तसे दर्शवणारे पुरावे नाहीत, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने म्हटले आहे की, २०१९ मध्ये गुन्हा नोंदवेपर्यंत महिलेने आरोपीबरोबर अनेक ठिकाणी भेट दिली व त्याच्याबरोबर राहिलीही. तक्रार केल्यानंतरही ती आरोपीबरोबर अनेक ठिकाणी गेली व ठाण्यातील अनेक हॉटेल्समध्ये त्याच्याबरोबर राहिली. दरम्यान, या प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता आरोपीचे तक्रारदार महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. त्यांनी एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आणि काही कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यांच्यात असलेले शारीरिक संबंध हे एकमेकांच्या सहमतीनेच होते, हे निश्चित असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या