आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/गेवराई:
आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली. नेहा धर्मराज कोरडे (वय ९ वर्षे) व अमृता धर्मराज कोरडे (वय ८ वर्षे) असे मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत.
गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे शनिवारी नेहा व अमृता या दोघी सख्ख्या बहिणी आईसोबत कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेल्या होत्या. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या दोन्ही सख्ख्या बहिणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच चकलंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. नदीतून मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले व या घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान गेवराई तालुक्यात यापूर्वीही मिरगाव, संगम जळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. त्यातच पुन्हा राक्षसभुवन या ठिकाणी शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचे उपाय अवलंबण्याचे आवाहन केले आहे.