


आदमापूर ग्रामपंचायतीने काढले पत्र!
मी बाळूमामांचा भक्त,नाअवतार,ना वंशज: मनोहर भोसले
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आदमापूर व करमाळा:
आदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या वंशावरून मोठा वाद पेटला आहे.बाळूमामा देवालय ट्रस्ट आणि आदमापूर ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्ह्यातील मनोहर भोसले यांच्याबाबत ठरावाचे पत्र काढल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.तर आपण बाळूमामाचे फक्त एक भक्त आहोत,वंशज नाहीत असं मनोहर भोसले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे मूळ स्थान आहे. तेथे वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. संत बाळूमामा हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.
मात्र आता त्यांच्या नावाने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले स्वतःला संत बाळूमामाचा वंशज आणि शिष्य म्हणून बनाव करत असल्याचा आरोप आदमापूर ग्रामपंचायत आणि बाळूमामा देवालय ट्रस्टने केला आहे. बाळूमामांनी समाधी घेतलेल्या आदमापूरच्या ग्रामस्थांनी या मनोहर भोसले यांच्याबाबत जोरदार मोहीम सुरू केली आहे. तसेच बाळूमामांचे कुणीही वंशज नाही. त्यामुळे मनोहर भोसले आणि बाळूमामाचा कोणताही संबंध नसल्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. मनोहर भोसले यांच्याविरोधात अनेक पुरावे गोळा केले आहेत.
बाळूमामांनी आपलं सारं आयुष्य गोरगरिबांसाठी वेचलं. त्यांनी कधी कोणाकडून एक दमडीही घेतली नाही. मात्र त्यांच्याच नावाने देवत्वाचा बुरखा पांघरून कोणी सामान्यांची लूट करत असेल, तर अशा भोंदूंना चांगलीच अद्दल घडवण्याची मागणी आदमापूर ग्रामपंचायतीने केली आहे.आदमापूर येथील ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील मनोहर मामा भोसले यांच्याबद्दल एक पत्र काढल्यानंतर बाळूमामा यांच्या वारसावरून हा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, आपण बाळूमामांचा वंशज असल्याचा कोणताही दावा केला नसल्याचं मनोहर भोसले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.आपण बाळूमामांचे भक्त आहोत, बाळुमामांची उपासना करतो. पण आजपर्यंत कधीही बाळूमामांचे वंशज अथवा त्यांचा अवतार आहे, असे वक्तव्य कुठेही केलेले नाही. तसेच श्री क्षेत्र उंदरगाव येथील मठातून भक्तांची कुठलीही आर्थिक लूट केली जात नाही,असे स्पष्टीकरण मनोहर मामा भोसले यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद