तासगावात वनक्षेत्रपालासह ऑपरेटर ३० हजारांची लाच घेताना ‘जाळ्यात’

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
लाकूड वाहतुकीचे वाहन सोडण्यासाठी झाला ‘सौदा’
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली :
तासगाव वनविभागातील वनक्षेत्रपाल कौशल्या हणमंत भोसले (वय ३०,रा.तासगाव) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. वनविभागातील ऑपरेटर श्रीकांत तुकाराम शिंदे (वय ४३,रा.मणेराजुरी ता.तासगाव) याच्या माध्यमातून भोसले यांनी ही लाच स्वीकारली. लाकूड वाहतुकीचे वाहन सोडण्यासाठी ही लाच घेण्यात आली.सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचा लाकूड वाहतुकीचा ट्रक तासगावच्या वनविभागाने महिनाभरापूर्वी पकडला होता.हा ट्रक सोडून देण्यासाठी उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांनी संबंधिताला ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने तक्रारीची दखल घेऊन तासगाव येथे सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराला उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांच्याकडे पाठविण्यात आले.
यावेळी भोसले यांनी गाडी सोडायची असेल तर तीस हजार रुपये लागतील, असे सांगितले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पुन्हा तक्रारदाराला तीस हजार रुपये घेऊन भोसले यांच्याकडे पाठवण्यात आले.यावेळी भोसले यांनी ही रक्कम वन विभाग कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदार ही रक्कम घेऊन शिंदे यांच्याकडे गेला. त्यावेळी ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदे याला रंगेहाथ पकडले. तर कौशल्या भोसले यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस उपअधिक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस अंमलदार अविनाश सागर ,धनंजय खाडे, संजय संकपाळ,सलीम मकानदार, अजय पाटील, राधिका माने, विना जाधव, श्रीपती देशपांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.