वाढदिवस! अन् चिंचेच्या झाडांचा !

जतच्या ‘चिंच विसावा’ कृषी पर्यटन केंद्रात केक कापून साजरा!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जतसारख्या दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेल्या ‘चिंच विसावा’ या कृषी पर्यटन केंद्रातील चिंचेच्या झाडांचा २१ वा वाढदिवस पर्यावरण व कृषीप्रेमी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे महाराजांचे शिष्य असलेल्या चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज, जागर फाउंडेशनचे प्रमुख तथा जतचे माजी नगरसेवक परशुराम मोरे, पत्रकार अनिल मदने, गोपाल पाथरुट, जॉकेश अदाटे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू वाघमारे, अवि,नाश कुलकर्णी, ग्रामसेवक बिभीषण सावंत, पत्रकार डॉ. नाना हालंगडे, डॉ. बाळासाहेब मागाडे, सुशांत मागाडे, बंडू वाघमोडे आदी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट २००० साली ५० चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. याच ठिकाणी चिंच विसावा अॅग्रो टुरिझम साकारले आहे. चिंचेच्या झाडांची लागवड करणारे राजाराम शिंदे, झाडांचे पालनपोषण करणारे संभाजी बोराडे, ‘चिंच विसावा’चे प्रमुख प्रल्हाद बोराडे व सौ.उज्ज्वला बोराडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
जत तालुका म्हटलं की भयंकर दुष्काळ! हे कोणास नाही आठवलं तर नवलंच. एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणा-या युवकाने पाण्याअभावी शेती करायची म्हणून याच तालुक्यातील शेगावजवळ २० वर्षांपूर्वी चिंचेची ५० झाडे लावली. हा प्रयोग आता “चिंच विसावा” या कृषी पर्यटन केंद्रात रुपांतरीत झालाय. दुष्काळी भागापुढे या कृषी पर्यटन केंद्रातून नवा आदर्श निर्माण केलेल्या तरुणाचे नाव आहे प्रल्हाद बोराडे! त्यांची पत्नी सौ. उज्ज्वला बोराडेंचीही त्यांना याकामी मोठी साथ मिळतेय.