

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /पिंपरी:
पिंपरी महानगरपालिकेतील एका बड्या नेत्याची लाचप्रकरणी अटकेत असताना न्यायालयाने अंतरिम जामीन नामंजूर केल्याने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर पालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. अटकेत असलेल्या लांडगे यांनी अर्ज दिला होता. आजीचे (आईची आई) निधन झाल्यामुळे तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे कारण सांगून लांडगे यांनी अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता.तो अर्ज मंजूर करीत 26 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
प्रत्यक्षात मात्र लांडगे यांच्या आजीचे नसून वडिलांच्या मावशीचे निधन झाले, अशी माहिती संबंधित पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यामुळे लांडगे यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केला. लांडगे यांनी न्यायालयात अंतरिम जामीन मिळण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे जामीन मिळण्यासाठी केलेला लांडगे यांचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अंतरिम जामीन नामंजूर झाल्याने लांडगे यांची न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे,त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे आणि लिपिक विजय शंभूलाल चावरिया यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. लांडगे यांनी यापूर्वी नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्याबरोबर इतर आरोपींनीही अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
काय आहे ‘हे’ प्रकरण?
मंजूर झालेल्या टेंडरची वर्कऑर्डर काढण्याकरिता 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. स्टॅडीग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे व अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
9 लाख रुपयांचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी – चिंचवड आणि पुण्यात प्रचंड खळबळ उडाली होती.संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे.अॅन्टी करप्शनचे पथक पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले होते.2 लाख रूपये पीएमार्फत स्विकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी नितीन लांडगे , त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे , मनपामधील अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या