मायलेकींची वारणा नदीत आत्महत्या !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कोल्हापूर :
कोडोली – चिकुर्डे (ता. पन्हाळा) या वारणा नदीवरील धरण पुलावरून मंगळवार दि. २४ रोजी रात्री उशीरा आईने दत्तक घेतलेल्या मतिमंद मुलीसह नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत नदीपात्रात त्यांचा मृतदेह सापडला. रेश्मा अमोल पारगावकर (वय ३६) व मुलगी रुद्रा (वय ७) रा. पांडुरंग तात्या कॉलनी, कोडोली ता.पन्हाळा अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे. पतीचे अपघाती निधन व दत्तक मुलगी मतिमंद असल्याने आलेल्या कौटुंबिक नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलिसांना मिळालेल्या लिहलेल्या चिठ्ठीमधून समजते.
कोडोली येथील रेश्मा व तिच्या पतीने चार महिन्यांची रुद्रा ही मुलगी दत्तक घेतली होती.परंतु दहा महिन्यानंतर ती मतिमंद असल्याचे त्यांना समजले होते.तरीही त्यांना तिचा लळा लागल्याने तिचा चांगला सांभाळ करत होते. रेश्मा ही कोडोली येथील खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. रेश्माच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. दत्तक घेतलेली मुलगी रुद्रा ही मतीमंद व पतीचे निधन त्यामुळे रेश्मा अस्वस्थ होती.
रेश्मा यांनी रुद्रासह मंगळवार दि.२४ रोजी रात्री उशीरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. तिथे असणाऱ्या मच्छीमार व अन्य एका तरुणाने सुमारे दोन तास त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परत पाठवल्याचे समजते. रात्री उशिरा तिने मुलीसह नदी पत्रात उडी घेतल्याचे काही नागरिकांनी बघितले.त्यांनी ही बाब कोडोली पोलिसांना कळवली. अंधार असल्याने त्यांना शोधता आले नाही.
सकाळी घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेंद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव व कर्मचारी, तलाठी अनिल पोवार, आपत्ती व्यवस्थेत मदत करणारे तरूण, गनिमी कावा ग्रुपचे कार्यकर्ते यांनी संयुक्तपणे कोडोली ग्रामपंचायतीच्या आपत्कालीन बोटीने शोध घेण्याचे काम सुरू केले. सकाळी आई रेश्मा हिचा तर दुपारी चारच्या सुमारास मुलगी रुद्रा हिचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता.वाळवा ) हद्दीत सापडला.