लाखभर अंगणवाडी सेविका त्यागल्या ‘त्या’ मोबाईलला!


एक लक्ष अंगणवाडी सेविका त्यांचे शासकीय मोबाईल शासनाला परत करणार!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०१९ मध्ये राज्यांतील १,०५,५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. या मोबाईलची वॉरंटी दोन वर्षे कालावधीची होती. तो कालावधी मे २०२१ मध्ये संपला आहे. हे मोबाईल २ जीबी रॅमचे आहेत. मोबाईलमध्ये लाभार्थींची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप इ. सविस्तर माहिती भरण्यात येते. मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्यामुळे व त्यांत भरावयाची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग होतात, लवकर गरम होतात व त्या मोबाईलवर काम करणे कठिण होते.हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते आता जुने झाल्यामुळे सततः नादुरूस्त होतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी रू. ३०००-८००० खर्च होतो व तो अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातो. महाराष्ट्रात हजारो मोबाईल बिघडलेले आहेत व ३००० पेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले आहेत.
केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अॅप दिले आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये रॅम कमी पडत असल्यामुळे हे अॅप डाउनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खाजगी / वैयक्तिक मोबाईलमध्ये हे अॅप डाउनलोड करावे लागते. हे अॅप इंग्रजीमध्ये असल्यामुळे अनेक कर्मचा-यांना त्रयस्थांच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. हे काम दैनंदिन स्वरूपाचे आहे. रोज त्रयस्थ व्यक्तीकडून माहिती भरणे शक्य नाही. शिवाय, या अॅपमध्ये डिलीटचा पर्याय नसणे, वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यायच्या सेवांबाबत त्याचप्रमाणे कोणतेही मार्गदर्शन न येणे, माहिती भरण्याची पध्दत अतिशय किचकट असल्यामुळे व या त्रुटींमुळे अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना इंग्रजीत अँपमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे हे बेकायदेशीर आहे.
ही बाब महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंत्री, महिला व बालविकास विभाग,प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग व आयुक्त, एबाविसे योजना यांना पत्र पाठवून व प्रत्यक्ष भेट घेवून निदर्शनास आणली. मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲप सदोष आहे हे मंत्री महोदयांनी स्पष्टपणे व उघडपणे मान्य केले आहे. पोषण ट्रॅकर अॅप्लीकेशन केंद्र सरकारने तयार केले आहे. त्यामध्ये राज्य सरकार काही बदल करू शकत नाही, अशी असमर्थता मंत्र्यांनी व्यक्त केली. मोबाईल सदोष आहे, हे मंत्री महोदयांनी मान्य केले आहे. परंतु नवीन चांगल्या प्रकारचे मोबाईल देण्याकरीता महाराष्ट्र सरकारकडे निधी नाही व तो निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून घ्यावा लागेल, अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.
मोबाईल व पोषण ट्रॅकर अॅप्लीकेशन सदोष असताना देखील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी त्या ॲपमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती अंगणवाडी सेविकांवर करीत आहेत. या अॅपमध्ये माहिती भरून पाठवली नाही तर अंगणवाडी सेविकांचे मानधन कापण्यात येईल, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशा धमक्या गेल्या अनेक महिने अंगणवाडी सेविकांना अधिकारी देत होते. म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीने या विरूध्द मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. ही केस ९.८.२०२१ रोजी न्यायमुर्ती सारंग कोतवाल व न्यायमुर्ती साधना जाधव यांच्यासमोर सुनावणीस आली होती. त्यामध्ये या याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अॅपमध्ये माहिती भरता न आल्यास त्यांचे मानधन कापू नये, असे आदेश दिले आहेत.
सध्याचे मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या, अंगणवाडी सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर ॲप द्या, या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी गेले १५ दिवसांत सर्व प्रकल्प अधिका-यांकडे या मागण्या लेखी सादर केल्या आहेत. परंतु शासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.
या परिस्थितीत महाराष्ट्रातल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी दि. १७.८.२०२१ पासून मोर्चाने प्रकल्प कार्यालयात जावून सर्व मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करणार आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने दिलीप उटाणे,कमल परूळेकर,शुभा शमीम,भगवान देशमुख,जयश्री पाटील,सुवर्णा तळेकर यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी लढा उभा केला आहे.