

हालगी लावून पार पडल्या शर्यती!
पडळकर ‘जिंकले’, ‘बाकी’ ‘हरले’!
अशा पार पडल्या बैलगाड्या शर्यती !
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या, आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या व प्रशासनाचा कडवा विरोध असताना शेतकऱ्यांनी प्रशासन यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून झरे येथील बैलगाडी शर्यती वाक्षेवाडी मैदानात हालगी लावून फटाक्याची आतषबाजी करीत पार पडल्या. शर्यती पूर्ण झाल्यानंतर आमदार पडळकर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. जांभुळणी येथेही जल्लोष साजरा केला. आजच्या बैलगाडी मैदानात आटोकाट प्रयत्न करून अगदी मुंबईपासून आलेल्या बैलगाड्या सोडण्यात आल्याची माहिती पडळकर समर्थकांनी दिली.
न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातलेली आहे.शासनाने या शर्यतीच्या अनुषंगाने आपले म्हणणे न्यायालयात सादर करणे आवश्यक असतानाच गेल्या काही वर्षापासून दिरंगाई झाल्याचे पडळकर यांचे म्हणणे आहे.यामुळे ‘चपळाई’च्या वैशिष्ट्याने परिपूर्ण असलेल्या खिलार जनावरांना बैलगाडी शर्यती बंद असल्यामुळे आता कवडीमोलाचे किंमत येऊ लागली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचे पाहून व शासन पुढील पावले लवकर उचलत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे येथे छकडागाडी शर्यत घेणार असल्याचे जाहीर केले होते.
न्यायालयाचा बंदी आदेश असताना या शर्यती होणार असल्यामुळे प्रशासनाने सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. याबाबत उच्च स्तरावर हालचाली होऊन आमदार पडळकर यांचा शर्यती घेण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. यामध्ये मंत्र्याचाही समावेश असल्याचे पडळकर यांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने याबाबत सतर्कतेच्या बैठका घेऊन खबरदारीचे उपाय राबवले होते. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. झरे परिसरातील नऊ गावांमध्ये संचार बंदीचा आदेश लागू केला होता. मोठ्या पोलीस फौजफाट्याचा झरे परिसरासह ठिकठिकाणी व नाक्यावर पोलिसांचा राबता होता. असे असतानाच या बैलगाड्या शर्यती कशा होतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
मोठे आव्हान असताना झरे परिसरासह जांभुळणी, अनुसेवाडी, वाक्षेवाडी या भागात शर्यतीसाठी मैदानाची जुळणी झाली होती. झरे येथे होणाऱ्या मुख्य मैदानावर पोलीस प्रशासनाने चरी खोदून मैदान रोखले होते. अशावेळी शेतकऱ्यांनी व समर्थकांनी मैदानाची पर्यायी व्यवस्था, उपलब्धता करून झरेसह जांभुळणी, अनुसेवाडी व वाक्षेवाडी परिसराचा पर्याय निवडला होता.
परंतु सर्वात योग्य असलेल्या झरे व निंबवडे दरम्यानच्या वाक्षेवाडी हद्दीतील पठारावरील मैदानात आज सकाळी या स्पर्धा शेतकरी व स्पर्धकाने सुरू केल्या. एकूण तीन लॉट सोडण्यात आले. मुंगीलाही शिरकाव होण्यास जागा नसल्यासारखा पोलीस बंदोबस्त व नाकाबंदीची स्थिती असताना अगदी गनिमीकाव्याने, छुप्या मार्गाने व मोठ्या हिंमतीने अगदी मुंबईपासून आलेल्या बैलगाड्या मैदानात पोचल्याचे पडळकर समर्थकांचे म्हणणे आहे.
आज सकाळी मैदानात पाच-पाच बैलगाड्यांच्या एकूण तीन फेर्या सोडण्यात आल्या आणि या स्पर्धा संपन्न झाल्या.प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकीत आमदार पडळकर समर्थकांसह शेतकरी व स्पर्धकाने या स्पर्धा पार पडल्या.
आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपा नेते जयवंतराव सरगर, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराम मासाळ, अधिकराव माने यांच्यासह मान्यवर व पडळकर समर्थक यांनी मैदानात हजेरी लावली.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक