अनैतिक संबंधाच्या कारणावरुन तरुणाचा खून!

कवठेमहांकाळ तालुक्यातील थबडेवाडी येथील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कवठेमहांकाळ:

अनैतिक संबंधाच्या संशयावरून कवठेमहांकाळ तालुक्यातील थबडेवाडी येथील भरत ज्ञानदेव खोत (वय ३५) या तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी संशयित भगवान रंगराव खोत (वय ३७) रा. थबडेवाडी याचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भरत खोत याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या रागातून भगवान खोत याने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास थबडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरत खोत याच्यावर हल्ला केला. डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात भरत गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर, पोलीस हवालदार राजेंद्र मानवर,चंद सिंग साबळे, विक्रम चव्हाण घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस संशयित आरोपी भगवान खोत याचा शोध घेत आहेत.