आ.गोपीचंद पडळकर यांच्यासह ४० जणांवर शर्यत प्रकरणी गुन्हा दाखल

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
छकडागाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातलेली आहे. राज्य शासनाने याबाबतची भूमिका न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे येथे छकडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाने त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केले.आमदार पडळकर यांना शर्यत घेऊ नये म्हणून प्रशासनाने नोटीसही दिली होती. बैठका घेऊन प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदीचे आदेश लागू केले होते. झरे येथील मुख्य धावपट्टीवर पोलिसांनी अडथळा निर्माण केला होता.
असे असतानाच आज सकाळी झरे-निंबवडे दरम्यान असलेल्या वाक्षेवाडी भागात मैदान तयार करुन या शर्यतीचे आयोजन करण्यात आले.याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ४० जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.