…यासाठी ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची गरज: गजानन पाटील

वैयक्तिक आरोग्य,कौटुंबिक स्वास्थ्य,सामाजिक मान-सन्मान यासाठी ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची गरज: जिल्हा सचिव गजानन पाटील
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ विटा :
अर्थक्रांती व राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत जेष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानची जिल्हास्तरीय सहविचार सभा व खानापूर तालुका जेष्ठ नागरिक संघटनेचा तालुका मेळावा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांचे अध्यक्षतेखाली मुक्तांगण वाचनालय विटा येथे संपन्न झाला.
‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या सर्वधर्मीय प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संयोजक थोर साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील, जिल्हा सचिव गजानन पाटील ,उपाध्यक्ष नारायण सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल पाटील उर्फ नाना यांचा शाल व गुलाब पुष्प सत्कार केला.
उर्वरित उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जेष्ठ नागरिकांच्या संदर्भात अनेक बाबींचा समाचार घेतला.वैयक्तिक आरोग्य,कौटुंबिक स्वास्थ्य आणि सामाजिक मान – सन्मानासाठी ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन ची गरज असल्याचे उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची राष्ट्रीय संपत्ती’ असून तिचे जतन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे . त्यांनी आपल्या आयुष्यात तन-मन-धनाने देशाच्या जडणघडणीत, देश उभारणीत आणि प्रगतीच्या कामात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या काळात प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रात परिश्रम घेतले आहे.आज हेच ज्येष्ठ नागरिक राज्य व केंद्र शासनाकडून दुर्लक्षित आहेत.त्यांचे 60 नंतरचे जीवन खूपच खडतर झालेले आहे.शेती आणि शेतमजुरी याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मार्गाने कुटुंबाचे उत्पन्नाचे अन्य साधन नसल्याने शासनाच्या धोरणामुळेआणि निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेती व्यवसाय तोट्यात असल्याने कुटुंबाचा करता पुरुषही हतबल झाला आहे .
घरातील ज्येष्ठांचे आजारपण, औषध पाणी, मुलांचे शाळा प्रवेश, शिक्षण आणि कुटुंबाच्या अन्य दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाल्याने तो ना-इलाजाने आत्महत्येकडे वळत आहे.एकूणच अशी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यांना आधार देणेची जबाबदारी स्वीकारणे हे सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे.
अशा कुटुंबातील जेष्ठ नागरिक मरणप्राय जीवन जगत आहेत,किमान अशा ज्येष्ठ नागरिकांना तरी दरमहा 10 हजार रुपये सन्मान निधी मिळावा. तो त्यांचा हक्क आहे,अशी आग्रही मागणी अर्थक्रांती व राष्ट्रीय अर्थिक साक्षरता मंच ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी केले .
उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी केंद्र शासनाला दिलेल्या प्रस्तावाची सविस्तर माहिती सांगितली. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी संघटनेच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला व ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ ॲट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर एक वेगळी आचारसंहिता निर्माण करावी, संसदेत स्वतंत्र कॅबिनेट दर्जाचा मंत्री व स्वतंत्र बजेट यासाठी राज्यसभेवर ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी घ्यावा , गावोगावी विरंगुळा केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करावेत , इत्यादी मागण्या केल्या.
संयोजक रघुराज मेटकरी यांनी सर्वांचे आभार मानले.परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.