अवैध गुटखा जप्त; दोघेजण ताब्यात !

दौंड येथे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ दौंड:

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दौंड येथील पाटील चौकात सुनील मारुती यादव यास पान मसाला, सुगंधी तंबाखू व गुटखा याची बेकायदेशीररित्या साठवण करून विक्री करत असताना पकडले. ओमनी कारसह पानमसाला, सुगंधी तंबाखू असा एकूण २ लाख ६ हजार रुपये किंमतीचा माल पकडला.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस पथक दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना दौंड येथील पाटील चौक येथे सुनील मारुती यादव हा प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला, सुगंधी तंबाखू व गुटका याची बेकायदेशीररित्या साठवण करून विक्री करत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या पथकाने दौंड येथील पाटील चौक येथे जाऊन सुनील मारुती यादव यांच्याकडील मारुती ओमनी गाडी (क्रमांक एम एच ४२ एच ६६५) या कारची पंचासमक्ष झडती घेतली. त्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला, सुगंधी तंबाखू असा माल आढळून आला. हा माल त्याने त्याच्या ओळखीचा व्यापारी नरेश हियालदास रोहिडा याच्याकडून घेतल्याचे सांगितले. या पथकाला नरेश रोहिडा याच्या गोल्डन जनरल स्टोअर्स येथे दुकानात ४३ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला, सुगंधी तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवण केलेला आढळून आला.
या कारवाईत एकूण २ लाख,५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दोघांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस फौजदार महेंद्र गायकवाड,हवालदार सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस नाईक अभिजित एकशिंगे यांनी केली.