जळभावीत वाळू चोरांवर पोलिसांची कारवाई!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

जळभावी येथील वाळू तस्करांवर माळशिरस पोलिसांनी कारवाई करून १ जेसीबी, १ ट्रॅक्टर, १ ब्रास वाळू असा १७ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
नदीऐवजी वाळू चोरांनी आपला मोर्चा ग्रामीण भागातील ओढे व नाल्याकडे वळविला आहे. ओढे, नाल्यांची खुदाई करून निघालेल्या वाळूवर पाणी मारले जाते व वितरित केली जाते. त्यामुळे अनेक गावातील ओढ्यांमध्ये वाळू चोरीचा प्रकार समोर येऊ लागला आहे. चढ्या दराने वाळू विकली जाते.नुकतेच जळभावी (ता. माळशिरस) हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ जेसीबी, १ ट्रॅक्टर, १ ब्रास वाळू असा १७ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
वाळू चोरी करताना संजय महादेव सूळ व गणेश शामराव सूळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कर्मचारी वैभव लेंडवे यांनी फिर्याद दिली.पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय थोरात अधिक तपास करीत आहेत.