वाळूप्रकरणी लाचखोर तहसीलदारास ठोकल्या बेड्या !

मोहाडी तालुक्याचे तहसीलदार देविदास बोंबुर्डे 30 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/भंडारा:
अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याच्या तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. देविदास बोंबुर्डे असे लाच घेताना रंगेहाथ पकण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. एसीबीने केलेल्या या सापळा कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्याकडे असलेल्या 2 ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु होती. ही वाहतूक सुरु ठेवण्यासाठी तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांनी प्रति ट्रॅक्टर 15 हजार याप्रमाणे दोन ट्रॅक्टरचे 30 हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.तक्रारदार यांच्या तक्रारीची शहानिशा करुन शुक्रवारी (दि.23 रोजी) सापळा रचून तहसीलदारास 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
आरोपी तहसीलदार विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.लाचलुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.