आ.गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांवर बाणुरगडप्रकरणी विटा पोलिसात गुन्हा दाखल

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ विटा:

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघाजणांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथरोग अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विट्याचे नायब तहसीलदार चेतन रमेश कोनकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे सोमवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजण्याच्या सुमारास बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या भूमिपूजन सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी १५० ते १७० लोकांच्या उपस्थितीत पर्यटन विकास अंतर्गत बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा परिसर विकास व पर्यटन पायाभूत विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम घेतला, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बानुरगडचे सरपंच सज्जन बाबर, खंबाळे येथील निलेश नेताजी पाटील, विधान परिषद सदस्य व भाजपा राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा येथील नायब तहसीलदार चेतन रमेश कोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता अधिनियम, भारतीय साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे जिल्हाधिकारी सांगली यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जे.ए.जाधव तपास करत आहेत.