जत येथील बंद असलेले ७० ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय त्वरित सुरू करावे : भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पवार
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत तालुक्यात दररोज कोरोणाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना तालुक्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही महिन्यापासून रुग्णसंख्या थोडी कमी झाली असल्याने समाज कल्याण वसतिगृहात सुरू असलेले ७० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर शासकीय रुग्णालय प्रशासनाने बंद केले आहे. तसेच तालुक्यातील खाजगी कोविड रुग्णालयसुद्धा बंद आहेत. त्यामुळे हे ७० बेडचे रुग्णालय प्रशासनाने सुरु करावे अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.
सुनील पवार पुढे म्हणाले, विस्ताराने मोठ्या असलेल्या जत तालुक्यातील रुग्णांची हेळसांड होऊ नये.काहींचे उद्योगधंदे बंद तर बाजारात मंदी आहे.शिवाय अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचाराचा खर्च परवडत नाही.
बरेचशी खाजगी कोरोना रुग्णालये बंद झाली आहेत. तसेच जत शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात फक्त २८ बेडचे कोरोना रुग्णालय सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद व पालकमंत्र्यांच्या सहकार्याने जतमध्ये चालू झालेले ७० खाटांचे सरकारी कोरोना रुग्णालय जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केले आहे.
तालुक्यात कोरोणाची साथ हळूहळू वाढत आहे. यामुळे उपचारासाठी सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होणार आहे. यासाठी उद्या महीला व बालकल्याण सभापती सौ. सुनीता पवार यांचे रुग्णालय सुरू करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार आहे. मागणी करूनही जतमध्ये ७० ऑक्सिजन बेडचे हॉस्पीटल पुन्हा सुरू न केल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे व आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्या आदेशावरून जत तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुनील पवार यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर