‘गाव मारायचं’ ठरवलंय का ‘साऱ्यांनी’ ?

गावगाड्यानं लावली वाट !
प्रशासनानेही फिरवली पाठ!
गुळवंची बनतंय की काय कोरोनाचा हॉटस्पॉट?

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

जत तालुक्यातील गुळवंची येथे १९०० लोकसंख्या असलेल्या गावात कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.एकाच दिवशी २८ रुग्ण सापडले आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी व महसुल अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही.गावात सर्व काही अलबेल असल्याची स्थिती दिसून येते आहे. यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन जनतेच्या मरणाची वाट पाहत आहे का ?प्रशासनाने गांभीर्य ओळखून ग्रामसुरक्षा दल सक्षम करावे व गाव कोरोना हॉटस्पॉट होण्यापासून वाचवावे असे मत गावातील सूज्ञ नागरिकांतून होत आहे.
गावातील साखळी तोडण्यासाठी रुग्णांचे कडक होमआयसोलेशन करावे, गावात औषध फवारणी करावी, ग्रामपंचायतीला कोरोनाच्या बाबतीत उपाययोजना करण्याबाबत गांभीर्य दिसत नाही. ग्रामपंचायतीकडून केली जाणारी जनजागृती, औषध फवारणी, स्वछता या सर्व बाबींकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. गावपातळीवरील आरोग्य विभाग आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहे. मात्र ग्रामपंचायत त्यांना कोणतेही सहकार्य करत नसल्याचे येथील गावकऱ्यांचे मत आहे. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष घातले नाही तर गुळवंची गाव पुन्हा एकदा कोरोणाचा हॉटस्पॉट झाल्याशिवाय राहणार नाही.