३५०० रुपये लाच घेताना पकडले! गुन्हा दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /खेड (पुणे):
पुणे जिल्ह्यातील खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता देवेंद्र मधुकर सोन्नीस (वय ५७ वर्षे) यास ३ हजार ५०० रुपयाची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जामीन अर्जावरील सुनावणीमध्ये हरकत न घेण्यासाठी व जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
पुणे जिल्ह्यातील खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात वकिलाच्या अशिलाच्या जामीन अर्जावरील सुनावणीमध्ये हरकत न घेण्यासाठी व जमीन मिळण्यास मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक देवेंद्र मधुकर सोन्नीस याने तक्रारदार वकिलाकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदार वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. ब्यूरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे तक्रारीची १, ६ व ८ जुलै रोजी पडताळणी करून १४ जुलै रोजी सापळा लावण्यात आला. यावेळी देवेंद्र सोन्नीस याने ३ हजार ५०० रुपये लाच स्वीकारली असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. पुणे ग्रामीण विभागाच्या खेड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती विजयमाला पवार करीत आहेत.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास, लाचमागणी संबंधाने तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 020/26122134,26132802,26050423 या क्रमांकावर तसेच हेल्पलाईन क्रमांक 1064 व तसेच व्हाट्सअँप क्रमांक पुणे 7875333333 व मुंबई 9930997700 तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी नागरिकांना केले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या