पत्नीनेच काढला चुलत दीराच्या मदतीने पतीचा काटा!

पत्नीनेच काढला चुलत दीराच्या मदतीने पतीचा काटा!
मासाळवाडीतील खून अनैतिक संबंधातून झाल्याचे निष्पन्न!
नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथे ३० जून रोजी मारुती कोंडीबा तळे (वय ३३ वर्षे) या तरुणाचा खून अनैतिक संबंधातूनच झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मारुती यांची पत्नी माया तळे (वय २५ वर्षे) व तिचा चुलत दीर आकाश तुकाराम तळे (वय २५ वर्षे) यांनीच मारुतीचा काटा काढला.जीवे मारून मृतदेह व स्कुटी गाडी रातोरात शेजारच्या विहिरीत फेकून अपघात झाल्याचा बनाव केला. याप्रकरणी माया व आकाश या दिर-भावजय यास अटक करण्यात आली आहे.
माया व आकाश या दोघांचे अनैतिक संबंध असल्याची तिचा पती मारुती यास कुणकुण लागली होती. यातून दोघा पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होते. भांडण सुरू असताना आकाश तेथे गेला. मारुती व आकाश यांच्यामध्ये वाद व झटपट सुरू असतानाच पत्नी मायाने पती मारुतीच्या डोक्यात मारले. त्यामध्ये मारुतीचा मृत्यू झाला.त्यानंतर रातोरात मृतदेह नजीकच्या विहिरीत स्कुटी गाडीसह फेकून देऊन अपघात झाल्याचा अभास-बनाव निर्माण केला.
मारुतीच्या मृत्यूबाबत अपघात नसून घातपात असल्याबाबतची मासाळवाडी व परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. मारुतीच्या घरच्या लोकांना अपघात नसून घातपात असल्याचा संशय येत होता. मारुतीचा भाऊ दादासो कोंडीबा तळे यांनी याबाबत संशय व्यक्त करून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती.
पोलिसांनी कसून चौकशी करून या खूनाबाबत माहिती मिळवून आरोपी माया मारुती तळे व आकाश तुकाराम तळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधातून खून झाल्याचे व अपघाताचा बनाव करून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रकार केला आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,पोलीस हवालदार जगन्नाथ पुकळे, पोलीस नाईक रामचंद्र खाडे,सौरभ वसमाळे, निशा येलपले यांनी खूनाचा उलगडा केला.