खरीप हंगाम पिक स्पर्धेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत:जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:


खरीप हंगाम 2021 मध्ये पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकांसाठी 31 जुलै 2021 पूर्वी व इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट 2021 पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
राज्यांमध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होवून अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात येत असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले.
पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 19 पिके खरीप हंगाम स्पर्धेतील आहेत. प्रति तालुका सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 किमान स्पर्धक संख्या आहे. पीकस्पर्धेतील सहभागी लाभार्थीच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रूपये आहे.
अर्ज दाखल करण्याची मूग व उडीद पिकासाठी तारीख 31 जुलै 2021 आहे, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल पिकांसाठी 31 ऑगस्ट 2021 आहे. पीक स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहीत नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात द्यावे. पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी गावचे कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मास्तोळी यांनी केले आहे.
पिकस्पर्धा विजेत्यांसाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस अनुक्रमे पुढीलप्रमाणे – तालुका पातळी – 5 हजार, 3 हजार, 2 हजार. जिल्हा पातळी – 10 हजार, 7 हजार, 5 हजार. विभाग पातळी – 25 हजार, 20 हजार, 15 हजार. राज्य पातळी – 50 हजार, 40 हजार, 30 हजार रूपये.