प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
शिराळा येथील पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस फौजदार कुमार काका वायदंडे यास २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावांच्या विरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याच्या कामात सहकार्य करण्यासाठी शिराळा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस फौजदार कुमार वायदंडे याने तक्रारदाराकडे २ ते ३ हजार रुपयेपर्यंत खर्च येईल, असे म्हणून लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ६ जुलै रोजी दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे आज पडताळणी केली असता त्यामध्ये वायदंडे याने तक्रारदाराकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लागलीच शिराळा पोलीस ठाणे येथे सापळा लावला असता कुमार वायदंडे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून २ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना रंगेहात पकडण्यात आले. त्या अनुषंगाने वायदंडे याच्याविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे व प्रशांत चौगुले तसेच पोलिस अंमलदार सलीम मकानदार,अविनाश सागर,संजय कलगुटगी,प्रितम चौगुले, रवींद्र धुमाळ, सीमा माने, अजित पाटील, राधिका माने, चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
लाचमागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 या क्रमांकावर तसेच हेल्पलाईन क्रमांक 1064 व तसेच व्हाट्सअँप क्रमांक 7875333333 व मोबाईल क्रमांक 8975651262 तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या