संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस येथील नगरपंचायत कार्यालयातील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार देविदास बाळासाहेब कावळे (वय 43 वर्षे) यास ३० हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. रस्ता व गटारीच्या कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी अहवाल मुख्याधिकार्यांना अहवाल पाठवून बिल मंजूर करून देण्याकरीता तडजोडीअंती ७० हजार रुपये पैकी पहिला हप्ता ३० हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
माळशिरस नगरपंचायत अंतर्गत एप्रिल २०२१ मध्ये सार्वजनिक रस्त्याच्या निविदा निघाल्या होत्या.या मंजूर झालेल्या निविदाधारक यांच्यासोबत सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून तक्रारदार यांनी करार करून रस्त्याचे व गटारीचे बांधकाम पूर्ण केले होते.या कामाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार हे माळशिरस नगरपंचायतीच्या कार्यालयात पाठपुरावा करीत होते. करारानुसार पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजुरीच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्या कामाचे मोजमाप करून त्याबाबत बिल मंजुरीसाठी अहवाल मुख्याधिकारी यांना पाठवण्याकरिता व बिल मंजूर करुन देण्याकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार देविदास कावळे याने तक्रारदार यांच्याकडे प्रथम एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ७० हजार रुपये लाच मागणी करून पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये लाचेची रक्कम माळशिरस नगरपंचायत कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्वीकारली असताना कावळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, सापळा पथकातील पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, स्वप्निल सन्नके यांनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या