‘रावसाहेब’ फरार : ‘अण्णासाहेब’ कॅच !

संखचा अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळचा तलाठी विशाल उदगिरे लाचलुचपतच्या जाळ्यात!

2 लाख,30 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संखमध्ये कारवाई !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

जत तालुक्यातील संख येथील अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळ व कोळगिरी गावचा तलाठी विशाल विष्णू उदगिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत जाळ्यात अडकले. अप्पर तहसीलदार म्हेत्रे फरार आहे, तर तलाठी उदगिरे यास लाच स्वीकारल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार हे त्यांच्या वाहनातून माती वाहतूक करीत असताना त्यांची वाहने संखचा अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळचा तलाठी उदगिरे यांनी अडवून कारवाई करण्यासाठी संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी लावली होती. या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी व वाहने सोडण्यासाठी अप्पर तहसीलदार म्हेत्रे व उदगिरे यांनी तक्रारदाराकडे 2 लाख,50 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी 5 जून रोजी सांगली येथील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात दिला होता.
या तक्रारीनुसार दि. 9, 11 व 16 जून रोजी तसेच आज दि. 22 जून रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली. त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहनावर कारवाई न करण्याकरिता व वाहने सोडण्याकरिता अप्पर तहसीलदार म्हेत्रे व माडग्याळचा तलाठी उदगिरे याने तक्रारदाराकडे 2 लाख, 50 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
आज दि. 22 जून रोजी संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी सापळा लावण्यात आला. अप्पर तहसीलदार म्हेत्रे व तलाठी उदगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून अप्पर तहसीलदार म्हेत्रे याच्या सांगण्यावरून तलाठी उदगिरे याने तक्रारदाराकडून 2 लाख,30 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना रंगेहात पकडण्यात आले. अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे फरार झाला आहे. त्या अनुषंगाने म्हेत्रे व उदगिरे यांच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे,अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव,अप्पर पोलीस उपायुक्त सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे व प्रशांत चौगुले, पोलीस अंमलदार अविनाश सागर, अजित पाटील, संजय संकपाळ, राधिका माने, संजय कलगुटगी, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 या क्रमांकावर तसेच हेल्पलाईन क्रमांक 1064 व तसेच व्हाट्सअँप क्रमांक 7875333333 व मोबाईल क्रमांक 8975651262 तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.