
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!
नंदकुमार विभुते व नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील करगणी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे यास चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी ग्रामपंचायत करगणी येथून नवबौद्ध समाज गल्ली शेटफळे रस्ता काँक्रीट करण्याचे काम घेतलेले आहे.या कामाचे बिल मंजूर करून जमा केल्याच्या मोबदल्यात करगणी ग्रामपंचायत येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39 वर्षे) याने बिलाच्या चार टक्के रक्कम लाच म्हणून मागितली असल्याबाबतची तक्रार आज दि. 15 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी अर्ज दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तातडीने आजच पडताळणी करून सरपंच गणेश खंदारे याने तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर लागलीच ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सापळा लावण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत येथील सरपंच खंदारे यांनी तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून चाळीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारले असताना रंगेहात पकडण्यात आले. सरपंच खंदारे विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुहास नाडगौडा, सांगली विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे व प्रशांत चौगुले तसेच पोलिस कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर,संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
लाचमागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 या क्रमांकावर तसेच हेल्पलाईन क्रमांक 1064 व तसेच व्हाट्सअँप क्रमांक 7875333333 व मोबाईल क्रमांक 8975651262 तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या